केजक्राईम डायरी

सवती मत्सर उफाळून आला अन ६५ वर्ष वयाच्या वृद्ध सवतीच्या मांडीवर गरम पाणी टाकले !

गौतम बचुटे/केज :- एकाच नवऱ्याच्या दोन बायका म्हणजे सवती सवती त्यांचे आपसात कधीच पटत नाही तर त्यांच्या कायम एकमेकींच्या विरुद्ध द्वेष आणि मत्सर खचून भरलेला असतो अगदी एकमेकींच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आहेत अशीच एक घटना केज तालुक्यात घडली असून माझे घर का उघडले म्हणून चक्क एका ६५ वर्षाच्या वृद्ध महिलेच्या अंगावर तिच्या सवतीने गरम पाणी टाकून जखमी केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बेळगाव येथील महादेव दातार यांना कौशल्या आणि गंगाबाई नावाच्या दोन बायका आहेत. त्यापैकी कौशल्या ही बेलगाव येथे राहात असून तिच्या नावावर असलेली जमीन इतरांकडून पेरणी करून त्यावर उपजीविका करीत आहे. तर गंगाबाई ही ठाणे येथे राहात आहे. दि.२३ मे सोमवार रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास कौशल्या ही शेतातुन घरी परत आली होती. त्या वेळी सवत गंगाबाई महादेव दातार हिने येवुन कौशल्या राहत असलेले घर का उघडले? असे विचारलेआणि तिने शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच चुली वरील दाळीचे गरम पाणी कौशल्या हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर टाकले. त्यामुळे कौशल्या हिच्या मांडीला भाजुन दुखापत झाली.
कौशल्या महादेव दातार हिने दि. २५ मे रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गु. र. नं. १९२/२०२२ भा. दं. वि. ३२३, ३३७, ५०४ नुसार गंगाबाई महादेव दातार हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!