चालत्या पिकअपमधून सोयाबीन, उडिदाच्या बियाण्यांची पोती लंपास

केज/प्रतिनिधी
धावत्या जीपची ताडपत्री फाडून वाहनातील सोयाबीन व उडिदाचे १२० पोते चोरट्यांनी हातोहात लंपास केले. चोरीची ही घटना बीड-अंबाजोगाई रस्त्यावरील केज तालुक्यातील टोलनाक्याजवळ रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जालना येथील बियाण्याच्या कंपनीतून पिकअपचालक भाऊसाहेब काशीनाथ शिंदे ( रा. बनगाव, ता. अंबड ) हे पिकअपमध्ये ( एमएच ०४ एफपी २१८६ ) सोयाबीन बियाण्याच्या ११० गोण्या व उडीद बियाण्याची १० पोती भरून लातूर येथे निघाले होते. १३ जून रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास केज-मांजरसुंबा रस्त्यावरील नव्याने होत असलेल्या टोल नाक्याजवळ वाहनाची गती कमी होताच अज्ञात चोरटे पिकअपवर चढले. त्यांनी पिकअपवरील ताडपत्री फाडून पिकअपमधील सोयाबीन बियाण्याची तीन पोती ( किंमत ८ हजार ४०० रुपये ) व उडीद बियाण्याची तीन पोती ( किंमत ११ हजार ७०० रुपये ) अशी २० हजार १०० रुपयांची बियाण्याची पोती अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
पिकअपचालक भाऊसाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.