अंबाजोगाई

शिक्षक आणि पत्रकारांनी ज्ञान वृद्धीसाठी सतत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार

अंबाजोगाई: शिक्षक आणि पत्रकार यांच्या कडे समाज सतत सजग नजरेने पहात असतो म्हणून त्याला सतत आपल्या चौकटीतच राहून आपल्या ज्ञानवृध्दीसाठी आपापल्या क्षेत्रात येणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.

येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने शहरातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या गौरव समारंभात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲङ किशोर गिरवलकर, प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर, प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांच्या सह व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त पत्रकार राम कुलकर्णी, अविनाश मुडेगावकर, जगन सरवदे, दत्तात्रय अंबेकर, अभिजित गाठाळ, परमेश्वर गित्ते हे उपस्थित होते.
आपल्या भाषणात सुदर्शन रापतवार यांनी आपल्या पत्रकारीतेतील सुरुवातीच्या काळातील बदलत गेलेल्या आजपर्यंतच्या स्थित्यांतराचा उल्लेख केला. गेली चाळीस वर्षे आपण पत्रकारीतेत सक्रीय असून हे काम आपण आपल्या आवडीने स्विकारले असल्याचे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणा जोपासत समाजातील तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी आपण पत्रकारीतेचा एक माध्यम म्हणून उपयोग केला.
पत्रकारीता आणि शिक्षक या दोन्ही व्यवसायाकडे एक उत्पन्नाचे साधन म्हणून न पहाता ते एक सेवावृत्तीने करण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. पत्रकार आणि शिक्षक यांच्या कडे समाज नेहमी सतत सजग डोळ्यांनी पहात असल्यामुळे त्यांना आपल्या चौकटीतच राहुन आपापल्या क्षेत्रात सतत विकसित होत असलेले नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असे मत ही सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या बिपीन क्षीरसागर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे कौतुक करीत अंबाजोगाई शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा जपण्याच्या कामात पत्रकार आणि शिक्षक यांचा महत्वाचा सहभाग आहे असे आवर्जून सांगितले. तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना खोलेश्वर महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲङ किशोर गिरवलकर यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या लिखाणाचे कौतुक करीत समाज हीत लक्षात घेवून केलेल्या पत्रकारीतेची दखल सामान्य नागरीकांपासुन उच्चन्यायालय ही घेतो असे सांगत असे सजग पत्रकार या शहरात आहेत आणि ते या संस्थेशी जोडल्या गेले आहेत याचा अभिमान व्यक्त करीत पुरस्कार प्राप्त पत्रकारांची लेखणी सतत अधिक विकसीत होवो अशा शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे पासून ते आज पर्यंतच्या पत्रकारीतेचा इतिहास सांगत पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा यथोचित गौरव त्यांनी आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दत्तप्रसाद गोस्वामी, प्रा. विनय राजगुरु यांनी केले तर आभार प्रा. प्रणिता धोंड यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. शैलेश पुराणिक यांनी म्हणलेल्या पसायदानाने झाला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!