अंबाजोगाईत विद्यार्थ्याला चामड्याच्या बेल्टने व गजाने मारहाण

अंबाजोगाई: येथील छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता १० वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यास त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी चामड्याच्या बेल्टने व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एका कोचींग क्लाससमोर मंगळवारी (दि. ८) घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन विद्यार्थी व तीन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेत हिंदीचा तास सुरु असताना शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नावर पीडित विद्यार्थ्याने उत्तर दिले. मात्र, तीन विद्यार्थ्यांना याचे उत्तर देता आले नाही. याचा राग मनात धरून शाळा सुटल्यावर उत्तर देणा-या विद्यार्थ्यावर उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांनी हल्ला चढवून मारहाण केली. आंबेडकर चौकातील एका कोचींग सेटंर समोर पीडित विद्यार्थ्यावर अन्य दोन विद्यार्थ्यांनी बेल्ट व लोखंडी गजाने मारहाण केली.ही घटना मंगळवार दि. ८ दुपारी घडली या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पिडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करून औषधोउपचार घेतला.याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन विद्यार्थी व तीन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस जमादार घोडके अधिक तपास आहेत.