अंबाजोगाईक्राईम डायरी

गडदेवाडी खून प्रकरणातील एका आरोपीने भीतीपोटी केली आत्महत्या

दुसऱ्यास न्यायालयीन कोठडी

अंबाजोगाई: तालुक्यातील गडदेवाडी येथे बाबुराव विठ्ठल गडदे ( ४५) रा.चिचखंडी ता.अंबाजोगाई यांच्या डोक्यात दगड घालून व गमजाने गळा आवळून खून केल्याची घटना १० मार्च उघडकीस आली होती. या प्रकरणांमध्ये दोन आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव गडदे व रामचंद्र गडदे दोघेही रा.गडदेवाडी ता.अंबाजोगाई अशी आरोपींची नावे आहेत. महादेव गडदे ( ३४) या आरोपीने पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी दि.१३ मार्च गडदेवाडी येथे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे( ३५) यास दि.१२ मार्च पोलिसांनी अटक करून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास सात दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे.
या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बाबुराव विठ्ठल गडदे राहणार चिचखंडी तालुका अंबाजोगाई हे ९ मार्च रोजी घरातून निघून गेल्याची तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.त्यानंतर १० मार्च रोजी दुपारी बाबुराव विठ्ठल गडदे यांचा डोक्यात दगड घालून व गमजाने गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे पोलीस कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके तैनात केली. त्यातील एक पथक गडदेवाडी गावातच ठाण मांडून होते. इतर दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीच्या शोधात होते.तपासाअंती आरोपी रामचंद्र गडदे आणि महादेव गडदे या दोघांविरुद्ध खुनाच्या आरोपावरून दि.११ मार्च ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यातील आरोपी महादेव गडदे याने दि.१२ मार्च पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी गडदे वाडी येथे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे हा ऊसतोडीसाठी म्हणून फरार होता. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यास झाल्या प्रकरणाबद्दल विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखवताच अखेर आरोपी रामचंद्र गडदे याने गुन्ह्याची कबुली देऊन दारूच्या नशेत हा प्रकार झाल्याचे पोलीसांना जबाबात सांगितले. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने रामचंद्र गडदे यास १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दि.१९ मार्च रोजी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!