उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर

बीड/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (१८ जून) बीड दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेणार असून बीडच्या कोरोना स्थितीसह खरिपाच्या हंगामाचा आढावा पवार घेणार अाहेत. प्रशासनाकडून याबाबत तयारी करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री पवार हे शुक्रवारी सकाळी जालन्याहून बीडमध्ये दाखल होतील. सव्वादहा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतील. यात सुरुवातीला ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत तर, त्यानंतर खरीप हंगामाचा आढावा घेतील. नियोजनानुसार दुपारी पाऊणेबारा वाजेपर्यंत ही बैठक चालेल. त्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमकडे रवाना होतील. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील आमदार, खासदार, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पवार यांच्या दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी तयारी केली जात होती. आरोग्य विभागासह कृषी विभागात अधिकारी माहिती संकलन आणि प्रेझेंटेशन तयार करण्यात व्यस्त होते.