पिंपळनेर परिसरात पहिल्यांदाच दमदार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा, दुबार पेरणी टळली

पिंपळनेर / प्रतिनिधी :
बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतकऱ्यांनी अल्पशा ओलीवरच पेरणी केली होती. कापूस, तूर लागवड करुन बाजरी, सोयाबीन सह इतर बियाणाची पेरणी केली, मात्र नंतर पावसाने दडी मारली होती, परंतु शनिवारी दुपारी पहिल्यांदाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुपार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपळनेर परिसरात वेळेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली, मात्र पेरणी करित असताना जमीनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल नव्हती, परंतु आता पावसाळा सुरु झाला अन् पाऊसही येईल असे वाटत असताना गत दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर ही खरिपाची पिके उगवली गेली मात्र पाऊस उघडल्याने ही कोवळी पिके सुकू लागली होती. पाऊस कमी असल्याने कापूस लागवडीत तूट ही मोठ्या प्रमाणात झाली. पाऊस येत नसल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय, या ची भिती शेतकऱ्यांना सतावत होती, मात्र शनिवारी दुपारी पावसाने दमदार हजरी लावली. या पावसाने शेत शिवारात पाणी जमा झाले होते. तर दुसरीकडे खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटातून सध्या तरी मुक्त झाला असून समाधान व्यक्त करीत आहे.