व्हॉटस्ॲप अकाऊंट हॅक करून दीड लाखांना गंडविले !

उदगीर जि. लातुर:
मित्राचे व्हाट्सॲप अकाऊंट हॅक करून आरोपिने फिर्यादीस दीड लाख रुपयांच्या मागणीचा संदेश व्हाट्सअप द्वारे पाठवला. मित्रास पैशाची गरज असेल म्हणून फिर्यादीने दीड लाख रुपये ऑनलाईन पाठवून देऊन मित्रास सांगितले. परंतु मित्राने पैसेच मागितले नसल्याचे सांगितल्यानंतर मित्राचा व्हाट्सॲप अकाऊंट हॅक करून फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हैदराबाद येथे राहणारे फिर्यादी मकरंद पद्माकर देशमुख हे उदगीर येथे त्यांच्या सासुरवाडीत आले होते. त्यांच्या एका मित्राच्या व्हाट्सअप क्रमांकावरून वरून दीड लाख रुपयांची मागणी करुन सोबत खाते क्रमांक आल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. फिर्यादी मकरंद देशमुख यांनी विश्वासाने मित्राने पैसे मागितले आहेत, म्हणून ऑनलाईन पद्धतीने दीड लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. रक्कम ऑनलाईन पाठवल्यानंतर मित्राशी झालेल्या संभाषणातून व्हाट्सअप अकाउंट हॅक करून फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. फिर्यादी मकरंद देशमुख यांना आरोपी प्रीतम कुमार रेंग रा. डूलूमा (त्रिपुरा) याच्या खात्यात सदरील रक्कम गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फिर्यादीने उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रीतम कुमार रेंग याच्याविरुद्ध गु. र. न. १६८ / २१ कलम ६६ (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गोरख दिवे हे करीत आहेत.