पत्नीचा खून करुन पतीने घेतला गळफास!

नायगाव (जि. नांदेड)
शेतातील किरकोळ काम करण्यावरुन पती-पत्नीत झालेल्या भांडणावरुन रागाच्या भरात पत्नीचा खून केला तर या घटनेच्या पश्चातापामुळे पतीने शेतात जाऊन झाडाला गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील नरंगल येथील रहिवासी मोकिंदा भुजंग पटेकर व त्याची पत्नी सौ. रेणुकाबाई मोकिंदा पटेकर (५०) यांच्यात गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे वाद झाला. शुक्रवारी पहाटे सौ. रेणुकाबाई गावालगतच्या जनावरांच्या गोठ्याकडे दूध काढण्यासाठी गेली होती. तिच्या पाठोपाठ पती मोकिंदाही गेला. तेथे त्यांच्यात शेतातील कामावरून वाद झाला. रागाच्या भरात मोकिंदाने तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत पत्नी सौ. रेणुकाबाई पटेकर यांचा जागीच मृत्यू झाला. ते पाहून पती मोकिंदा यांनी दुसऱ्याच्या शेतात जाऊन सकाळी साडे सहाच्या दरम्यान गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती पोलीस पाटील व ग्रामस्थांनी नायगाव पोलिस ठाण्याला कळविली. त्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर नायगाव ग्रामीण रुग्णालयातून दोन्ही मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. मयताचा मुलगा शिवाजी मोकिंदा पटेकर (२५) यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२ प्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यात मयत मोकिंदाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.