अंबाजोगाई

अंबाजोगाई तालुक्यातील चार विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करीत मिळवला वैद्यकीय प्रवेश

अंबाजोगाई:  परिस्थिती कशीही असो ती शिक्षणात कधी अडसर ठरू शकत नाही. हे तालुक्यातील शेतकरी व मजुरांच्या मुलांनी सिध्द करून दाखविले आहे. या चारही मुलांनी वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळविला आहे. परिस्थितीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतू आपल्या पाहुण्यांकडून व काही संस्थांच्या मदतीने पैश्याची सोय करून हे प्रवेश निश्चित केले.

पाटोदा ममदापूर (ता.अंबाजोगाई) येथील बालासाहेब घोरपडे यांचा मुलगा प्रविण याने यंदाच्या वैद्यकीय प्रवेश (नीट) परीक्षेत (५९२) गुण मिळविले होते. त्याने अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्याच्या कुटुंबाला गावच्या शिवारात फक्त ३० गुंठे जमीन, त्यावर भागत नसल्याने व मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या आई, वडिलांनी मजुरी करीत या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले. बालासाहेब हे सुशिक्षित असल्याने त्यांनी गावातच (२० मुलांची) नववी व दहावीच्या गणिताची खासगी सायंकाळी शिकवणी घ्यायची व दिवसभर जेथे मिळेल तिथे मजुरी करायची. त्यावरच मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह चालवायचा, याचे फलितही त्यांचा पाल्य प्रविणने करून दाखविले. दुसर्याच प्रयत्नात त्याने नीट मध्ये यश प्राप्त करून यशाला व ध्येयाला गवसणी घातली. यांच्या दुसऱ्या मुलीनेही आई, वडिलांचे स्वप्न साकार केले. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊन दोन दिवसापूर्वीच त्याला कंपनीत नोकरीही लागली आहे.
——-
दुसरा याच गावचा सुंदर गवळी यांचा मुलगा सुरज याने दुसऱ्या प्रयत्नात निट मध्ये (५८९) गुण घेऊन अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. सुरजचे वडीलही अंबाजोगाईत एका ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये कामाला आहेत. त्यांना गावाकडे जेमतेम दीड एकर शेती आहे. ही शेती व मजुरी या कष्टाच्या पैश्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या शिक्षणासाठी त्याला त्याच्या मामाने काही मदत केली. यांचा दुसरा मुलगाही बी.एससी.नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

यशवंतची भरारी

मोहा (ता.परळी) येथून मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेले बिभीषण देशमुख हे समोसा विकण्याचा व्यवसाय करतात. दोन मुलांसह ते किरायाच्या दोन खोल्यात राहुन आपला व्यवसाय चालवतात. सुरूवातीला तर ते स्वतः व त्यांची आई शाळेसमोर बसून समोसे विकत असत, काही दिवसातच त्यांनी कष्टाने आपल्या व्यवसायात विश्वास कमावला, त्यामुळेच आता त्यांना घरबसल्या समोरच्याच्या ऑर्डर मिळतात. परंतू दिवसभर त्यांची पत्नी, आई व ते स्वतःच तेल भरलेल्या गरम कडईसमोर बसून कष्ट घेतात, ते मुलांच्या शिक्षणासाठीच, आई, वडिलांचे कष्ट यशवंतच्या डोळ्यासमोर होते. त्याने याचे फलित ठरवत पहिल्या प्रयत्नातच नीट मध्ये (६०७) गुण मिळवत भरारी घेतली. त्याचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे. त्याच्या मामाने व काकानेही त्याला शिक्षणासाठी मदत केली. आता वैद्यकीय शिक्षणाचाही प्रश्न त्याच्यापुढे आहे.

क्लास न लावता यश

उजनी (ता.अंबाजोगाई) येथील ऋषीकेश धनंजय स्वामी याचे वडील धनंजय हे वाहन चालक आहेत. स्वत:ची गाडी ते भाडे करून चालवतात, तेही मुलांच्या शिक्षणासाठीच अंबाजोगाईत राहतात. परिस्थिती अभावी त्यांच्या मुलाला तर बारावीला शिकवणीची लावता आली नाही, त्यामुळे त्याला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. दुसर्या प्रयत्नातही ऋषिकेशने खासगी शिकवणीवर खर्च न करता, ऑनलाईन मिळालेल्या लिंकवरच नीटचा अभ्यास केला. त्यात त्याने (६०३) गुण घेत अंबाजोगाईच्याच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला.

संस्था धावल्या मदतीला

परिस्थिती कशीही असली, तरी समाजात माणुसकी अजूनही जिवंत आहे. या चारही मुलांची धडपड आणी जाणीव, सेवा सहयोग अंतर्गत चालणाऱ्या “विद्यार्थी विकास सहाय्य योजना” या संस्थेने शोधली. परिस्थितीमुळे जी मुले शिक्षण करू शकत नाहीत, अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना ही संस्था मदत करते. संस्थेचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष त्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती घेत मदतीचा हात दिला. या योजनेचे प्रमुख रविंद्र कर्वे यांनी या विद्यार्थ्याचे सहाय्य योजनेतून शुल्क भरण्यासाठी निवड केली. अंबाजोगाई तालुक्यातील या चारही मुलांचे वैद्यकीय शैक्षणिक शुल्क भरत असल्याचे लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर,प्रा एस के गुजर ,बिपीन क्षीरसागर यांनी सांगितले.

आधार माणुसकीचा उपक्रमा मार्फत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक साहित्याचा आधार

येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था अंतर्गत “आधार माणुसकीचा ” ही संस्थाही लोकसहभागातून अशा मुलांचा शोध घेत मदतीसाठी पुढे येत असते, निट मध्ये चांगले गुण घेतलेल्या या चारही मुलांना संपर्क करून त्यांना ऍड पवार यांनी सेवा सहयोग अंतर्गत चालणाऱ्या ” विद्यार्थी विकास योजना ” या संस्थेशी संपर्क करून दिल्या नंतर प्रवेश प्रक्रिया शुल्क विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले,तसेच पुस्तके व शैक्षणिक साहित्यासाठी लोकांच्या सहभागाने मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा गुणवंत मुलांच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे अशी अपेक्षा ॲड. संतोष पवार यांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!