परळी

डॉक्टरचा प्रताप साखरपुडा एकीशी; लग्न केले दुसरीशी

परळी/प्रतिनिधी:

परळीतील रहिवासी व लातूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉक्टरने परळीतील एका मुलीशी साखरपुडा करत हॉस्पिटल टाकण्यासाठी ७ लाख हुंडा घेतला. यानंतर काही महिन्यांत दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्याचा प्रताप केला. या डॉक्टरविरुद्ध परळी शहर पोलिसांत ७ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील सोमेश्वरनगरातील व सध्या साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संदीप वसंतराव मंत्रे हा परळीतील एका मुलीच्या घरी गतवर्षी १८ सप्टेंबर रोजी जाऊन तिच्या वडिलास मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी ५ मे रोजी करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाइल बंद केला. अखेर ४ एप्रिल रोजी संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे सोशल मीडियाद्वारे क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. मंत्रेवर परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला. केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत अशा आरोपांचा व्हिडिओ करून तो नातेवाइकांत पाठवून मुलीची, तिच्या वडिलांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!