तरूणाचा खून करून मृतदेह मांजरसुंबा घाटात फेकला

नेकनूर/प्रतिनिधी :-
लिंबागणेश येथील २५ वर्षीय तरूणाचा रात्री अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्रीने वार करून खून करत मृतदेह मांजरसुंबा घाटात फेकून देत अपघात भासवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच बीड ग्रामीण, नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. खून का व कोणी केला? या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
लिंबागणेश येथील निलेश शहादेव ढास (वय २५ वर्षे) या युवकाचे रात्री अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह त्याच्या बुलेटवर आणुन मांजरसुंबा घाटात फेकला. त्याचा अपघात झाला असा त्यांना बनाव करायचा होता. या उद्देशाने तो टाकण्यात आला. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक साबळे, एपीआय दिपक रोटे, नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पीएसआय किशोर काळे, विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. त्यानंतर सकाळी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. पोलीसांनी मयत निलेश याचे कॉल डिटेल्स मागवले असून मांजरसुंबा परिसरातील सीसीटीव्ह फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. मात्र दुपारी उशिरापर्यंत पोलीसांना या प्रकरणातील आरोपीचा सुगावा लागला नव्हता.