अंबाजोगाई – येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भिकाभाऊ राखे गुरुजी यांचे सुपुत्र आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी प्राध्यापक प्रा. अरविंद राखे गुरुजी यांचे मंगळवारी दुपारी 1:30 वाजता दुःखद निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून वृद्धापकाळाच्या आजाराने त्रस्त होते.
येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अंबाजोगाई शहर आणि शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. प्रा. अरविंद राखे गुरुजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतले होते. त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयात लिपिक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. आपल्या प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी शिक्षक पदापर्यंत मजल मारली. पुढे योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. वाचन आणि संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक-शिक्षक म्हणून ते सर्वत्र ओळखले जात असत. त्यांच्या शिकवण्याच्या ओघवत्या शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या हाताखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मोठा विद्यार्थी वर्ग आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
