गौतम बचुटे/केज :- चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल की नाही, याबाबत अनेकजण साशंक असतात, म्हणून अनेकजण तक्रार देण्यास धजावत नाहीत. मात्र केज पोलिसांनी ही शंका खोटी ठरवली आहे. केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तब्बल 14 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले असून, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जत्रा, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे 14 मोबाईल गहाळ व हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी विशेष पथक तयार केले.जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने तपास सुरू केला.

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, नितीन वारे, संतोष गिते यांनी CEIR प्रणालीद्वारे या सर्व मोबाईलचे ट्रेसिंग केले. अत्यंत कौशल्याने तपास करून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे 14 मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर मूळ मालक व वापरकर्त्यांशी संपर्क साधून सर्व मोबाईल त्यांना परत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, नितीन वारे, संतोष गिते आणि नितीन जाधव उपस्थित होते. केज पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.