अभय ओक यांचे 14 ऑक्टोबरला व्याख्यान

अंबाजोगाई: जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित १८ व्या व्याख्यानमालेचे पुष्प बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे संपन्न होत आहे. यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. अभय ओक यांचे व्याख्यान असणार आहे.

हा स्मृती समारोह विचारांचा जागर मानला जातो. कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान, अंबाजोगाई आणि महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा यांच्या वतीने दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. बीड जिल्ह्याचे माजी खासदार, पुरोगामी विचारवंत आणि शोषित, वंचितांचे लढाऊ नेते म्हणून कॉ. बुरांडे यांची ओळख होती. यंदाच्या वर्षीच्या चर्चासत्रासाठी ‘आजच्या लोकशाही व्यवस्थेत निर्भीड न्यायव्यवस्था व स्वायत्त संवैधानिक संस्था – सद्य परिस्थिती’ हा ज्वलंत विषय निवडण्यात आला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या चर्चासत्रात सर्वोच्च न्यायालयाचे निर्भीड न्यायमूर्ती म्हणून ओळखले जाणारे मा. न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलणार आहेत. त्यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. रविंद्र बोर्डे आणि मा. पुखराज बोरा हे देखील सहभागी होणार आहेत.

यावेळी वकील क्षेत्रातील दोन मान्यवरांचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. जयंत जायभाये आणि माजी अध्यक्ष अॅड. वसंतराव साळुंके हे सत्कारमूर्ती असणार आहेत.या वैचारिक कार्यक्रमास नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...