नायब तहसीलदार भंडारे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

गौतम बचुटे /केज:- केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांच्याकडील तहसीलदार पदाचा पदभार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काढून घेतला असून त्यांच्याकडील पदभार नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आमदार नमिता मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीला अनुपस्थित राहणे गंगावणे यांना भोवले आहे.

केजचे तत्कालीन तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात भारत गंगावणे यांनी केज तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला होता. दरम्यान, राज्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना केज येथे आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळावर करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार यांच्यासह तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. मात्र तालुक्याचे प्रमुख समन्वय अधिकारी असलेले तहसीलदार भारत गंगावणे या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर होते. ही बाब आमदार मुंदडा यांनी निदर्शनास आणून दिली होती. एवढेच नव्हे तर यापूर्वी 1 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केजला भेट दिली असता त्यावेळीही तहसीलदार गंगावणे गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

या सर्व बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्या राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून तहसीलदार हे तालुकास्तरावरील दुष्काळ निवारण उपाययोजनांचे प्रमुख समन्वयक असतात. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या पाहणी व आढावा बैठकीस अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित कार्यक्षमता व उपलब्धता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे.