अंबाजोगाई/बीएन प्रतिनिधी:
खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या काढणीला बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात वेग आला असून सध्या शेतशिवारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्याने हाती विळा घेऊन मजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात सोयाबीन काढणीच्या कामात व्यस्त आहेत.
गेल्या चार महिन्यांपूर्वी पेरलेले सोयाबीन पीक आता काढणीला आले आहे. अनेक शेतकरी हाताने सोयाबीनची झाडे उपटून त्याच्या पेंढ्या बांधून बैलगाडी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने घरी आणत आहेत. काही ठिकाणी काढलेले पीक शेतातच गोळा करून मळणी यंत्राची वाट पाहिली जात आहे. अवकाळी पावसाची भीती असल्याने शेतकरी पीक लवकरात लवकर घरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाला चांगला उतारा येत नसल्याचे चित्र आहे.
मशागतीचा खर्च वाढला
अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीसाठी मजुरी आणि मशागतीचा खर्च वाढला असून पिक लावण्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी राजाभाऊ अंजान यांनी सांगितले.सध्या काढणीमुळे ग्रामीण भागात मजुरांची मागणी वाढली असून मजुरीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांअभावी हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी करत आहेत. एकंदरीत काढणीमुळे शेतशिवारात उत्साह असला तरी उत्पादन किती मिळेल आणि बाजार समितीत काय दर मिळेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

