मेला समजून सोडून पळाले

गौतम बचुटे/केज:– शेतीच्या काकरीच्या कारणावरून चुलत भावावर काठी, लोखंडी गज आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाघेबाभूळगाव (ता. केज) येथे घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शेतकरी मरण पावला असे समजून आरोपी पती-पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शेतकऱ्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.

जखमी सोमनाथ भागवत घायाळ यांना त्यांचा चुलत भाऊ योगेश शिवाजी घायाळ हा जमिनीच्या कमी-जास्त वाटपावरून वारंवार “जिवे मारून टाकेन” अशी धमकी देत होता.उसाच्या शेतात नेऊन हल्ला
दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता सोमनाथ घायाळ यांनी सोयाबीन काढणीनंतर शेतातून निघाले असता, आरोपी योगेश घायाळ आणि त्याची पत्नी वंदना घायाळ यांनी त्यांना एकटे गाठून शेजारील विशाल हावळे यांच्या उसाच्या शेतात नेले. तेथे दोघांनी काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करून डोक्यात धारदार दगड घातला.

रक्ताच्या थारोळ्यात आढळले

हल्ल्यानंतर सोमनाथ बेशुद्ध पडल्याने ते मरण पावल्याचे समजून आरोपी पसार झाले. रात्री 9 वाजेपर्यंत घरी न आल्याने पत्नी निलावती आणि आई मंडूबाई यांनी शोध घेतला असता ते उसाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले. प्रथम नेकनूर सरकारी रुग्णालयात आणि नंतर बीड येथील जीवन ज्योत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूला गंभीर दुखापत आणि सूज आल्याने ते बेशुद्धावस्थेत आहेत.

गुन्हा दाखल

याप्रकरणी 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 642/2026 नुसार योगेश घायाळ आणि वंदना घायाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करीत आहेत.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...