तलावांमधील २१ मोटरींचे वीज कनेक्शन खंडित
विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व आसपासच्या परिसरातील तलावांमधून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध पाणी उपशावर रोख लावण्यासाठी महसूल व पाटबंधारे विभागाने संयुक्त धडक मोहीम राबवली आहे.
तालुक्यातील वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलली असून, तलावांमधून अवैधपणे पाणी खेचणाऱ्या २१ मोटरींची वीज जोडणी खंडित करत साहित्य जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.या मोहिमेदरम्यान प्रशासकीय पथकाने घाटनांदूर परिसरातील तलावांची पाहणी केली. यामध्ये आसर्दोड तलाव येथून ७ मोटरींचे वीज कनेक्शन कट करण्यात आले, तर गादा तलाव (गादामोद तलाव) परिसरातून १४ मोटरींचे वीज कनेक्शन कट करून वायर आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत तहसीलदार कार्यालयाचे पथक, पाटबंधारे विभागाचे अभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि महावितरणचे (MSEDCL) कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.
“घाटनांदूर परिसरामध्ये कंबर तलाव, गादा तलाव, आसरडोह तलाव आणि मांगदरा तलाव अशी चार तळी आहेत. यापैकी आसरडोह तलावावरील ७ मोटरींचे तर गादा तलावावरील१४ मोटरींचे कनेक्शन कट केले आहेत. सर्व शेतकऱ्यांना आमच्यामार्फत विनंती आहे की, भविष्याच्या दृष्टीने पाण्याचे जतन करावे. घाटनांदूर परिसर हा पाण्याच्या बाबतीत सुदैवी आहे, एवढे पाणी इतरत्र कुठे पाहायला मिळत नाही. त्यामुळे सर्वांनी पाण्याचा अपव्यय न करता त्याचे योग्य जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.” – विठ्ठल पंडीत (तलाठी,घाटनांदुर)
“घाटनांदूर परिसरात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या पथकासह पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक आणि एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. गादा तलावातील १४ मोटरी आणि आसरडोह तलावातील ७ मोटरींचे विद्युत कनेक्शन कट करून वायर जप्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी यापुढे असा अवैध पाणी उपसा करू नये. भविष्यात माणूस आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे सर्वांनी पाण्याचे जतन करावे, अशी आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो.”तलावातील पाणी हे केवळ शेतीसाठी नसून परिसरातील ग्रामस्थांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढेही जर कोणी नियमबाह्यरीत्या मोटरी टाकून पाणी उपसा करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”- मंजुषा घुगे (मंडळ अधिकारी, घाटनांदुर)

