तानाजी माटे/लातूर: लातूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. जिल्हा क्रीडा खो-खो प्रशिक्षण केंद्र, लातूर तसेच भविष्यवेद क्रीडा मंडळाची खेळाडू आणि सरस्वती विद्यालय, लातूरची इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. आर्या संभाजी कोकणे हिने बॉक्सिंगमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे होणार आहे.
आर्या कोकणे हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय आणि विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या चपळता, ताकद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती आता लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. केवळ नववीच्या वर्गात शिकत असतानाच बॉक्सिंगसारख्या कठीण खेळात प्राविण्य मिळवलेली आर्या इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. जिल्हा क्रीडा केंद्रातील प्रशिक्षकांनी तिला कठोर सराव करून घेतला. दररोज पहाटे उठून शाळेचा अभ्यास सांभाळून मेहनत घेणाऱ्या आर्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.
परभणीत होणार राज्यस्तरीय स्पर्धा
बॉक्सिंग ची राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे संपन्न होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या निवडीबद्दल आर्या कोकणे, तिचे प्रशिक्षक आणि तिचे पालक यांचे भविष्यवेद क्रीडा मंडळ आणि सरस्वती विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. तिने परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेतही लातूरचे नाव रोशन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तिला पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

