धारूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील धारूर घाट हा वाहनचालकांसाठी काळ ठरत आहे. तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अंध वळणांमुळे येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी घाटातील अपघातप्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला खडबडून जागे केले आहे.

धारूर घाटातून दररोज शेकडो अवजड ट्रक, एसटी बसेस आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असते. वळणाचा अंदाज न आल्याने वाहने थेट दरीत कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घाटात उतरून पाहणी केली.यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाला कठोर निर्देश दिले. घाटातील सर्व धोकादायक वळणांवर मजबूत क्रॅश बॅरिअर तातडीने उभारावेत, तुटलेल्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करावी, असे आदेश दिले. रात्रीच्या वेळी अपघात रोखण्यासाठी रेडियम पट्ट्या, कॅट्स आय आणि रिफ्लेक्टर्स बसवण्याच्या सूचना केल्या. तसेच घाटाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक धोकादायक वळणावर मोठे दिशादर्शक फलक, वेगमर्यादा आणि ‘अपघातप्रवण क्षेत्र’चे बोर्ड लावण्यात यावेत. रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सुरळीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे धारूर घाटातील प्रवास आता सुरक्षित होईल, अशी अपेक्षा वाहनधारक आणि मोटर चालकांमधून व्यक्त होत आहे. या दौऱ्यावेळी PWD चे अभियंते, पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासन उपस्थित होते.