अंबाजोगाई/प्रतिनिधी:
आंबा साखर कारखाना ते ममदापूर-पाटोदा रस्त्यावर कारखान्यासमोर २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन दुचाकींचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबा कारखान्यासमोर एका स्प्लेंडर दुचाकीची (क्रमांक: MH 44 H 8574) आणि पॅशन प्रो दुचाकीची (क्रमांक: MH 13 AW 3230) समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे आणि हेडलाईटचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. अपघाताचा आवाज ऐकून कारखाना परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राडी आणि पाटोदा रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ पाहता येथे गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.