गौतम बचुटे/केज : तालुक्यातील साळेगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साळेगाव येथील भागवत मुळे हे दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या घरासमोर उभे असताना आरोपी सतीश मुळे तेथे आला. त्याने भागवत मुळे यांचा जन्मतः दिव्यांग असलेला भाऊ बबन मुळे याला शेतात कामासाठी चल, असे म्हटले. याला भागवत मुळे यांनी विरोध केला असता सतीश मुळे याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात सतीश मुळे याने भागवत मुळे यांच्या छातीवर लाथ मारली व हातात असलेल्या रेशमी नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत भागवत मुळे यांच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण उमटले आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली आहे. या प्रकरणी भागवत मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सतीश मुळे याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You must be logged in to post a comment.