गौतम बचुटे/केज:
टाकळी (ता. केज) येथील बहुचर्चित विलास घुले खून प्रकरण आता केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, उमेश माने याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेच्या नातेवाईकांनी त्याला मारहाण सुरू केली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेला विलास घुले याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मयताचा भाऊ रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९२/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९०, ११८(१) नुसार दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या SIT पथकाने करून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर हा तपास CID कडे वर्ग करण्यात आला.
CID पथकाने तपास पूर्ण करून दि. १५ सप्टेंबर रोजी १० आरोपींविरोधात केज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये रामेश्वर धर्मराज गायकवाड, बाबासाहेब उर्फ गोरख कदम, मंगेश गोरख कदम, शुभम रामेश्वर गायकवाड, सुरज उर्फ भैय्यासाहेब गायकवाड, राजकुमार मोहन मोरे, बंकट उर्फ अजय कदम, दीपक परसराम कदम, नवनाथ परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम यांचा समावेश आहे. दि. १६ सप्टेंबर व त्यानंतर दि. २९ सप्टेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. टी. चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, केज येथे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे.
त्यामुळे आता या खून प्रकरणाची पुढील सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.
