गौतम बचुटे/केज :- केज येथे अवघ्या दीड महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांचा पदभार काढण्यात आला आहे. आमदारांच्या दुष्काळी आढावा बैठकीला गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा आदेश दिला आहे. मात्र या कारवाईमागे अवैध मुरूम उत्खननावरील कारवाईचा राग असल्याची जोरदार चर्चा केज तालुक्यात रंगली आहे.

तहसीलदार गंगावणे यांनी आनंदगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करून वाहने जप्त केली होती. याच कारवाईनंतर सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याने दबाव टाकून वाहने सोडण्यास सांगितल्याची चर्चा आहे. परंतु तहसीलदार गंगावणे यांनी नियमानुसार दंड भरल्याशिवाय वाहने सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. याचाच राग मनात धरून आढावा बैठकीला गैरहजर असल्याच्या कारणावरून पदभार काढून तो नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे देण्यात आल्याचा आरोप होत आहे. वास्तविक तहसीलदारांनी किरकोळ रजा मागितली असताना वरिष्ठ कार्यालयाने टाळाटाळ केल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कारवाई संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. कोणतीही नोटीस न देता थेट पदभार काढणे चुकीचे असून या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन ही कारवाई अन्यायकारक आणि एकतर्फी असून चौकशी करून पुन्हा गंगावणे यांना पदभार द्यावा, अशी मागणी केली आहे.