जमा केलेली फी परत करण्यास सुरुवात
विश्वजीत गंडले/घाटनांदूर:
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील शाळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जमा करण्यात आलेली फी विद्यार्थ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
व्हिडीओ पहा:
याबाबत माहिती देताना लक्ष्मेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश शेटे यांनी सांगितले की, शासकीय नियमांनुसार १० वीच्या १७ विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात आली आहे. तसेच, ज्या १७ विद्यार्थ्यांकडून आधीच फी जमा करून घेण्यात आली होती, त्यांची फी त्यांना परत करण्यात आली आहे. दुसरीकडे, सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दि. ना. फड यांनी स्पष्ट केले की, सध्या त्यांच्या विद्यालयात १० वी आणि १२ वीच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून परीक्षा फी घेतली जात नाही, केवळ परीक्षेचे अर्ज (फॉर्म) भरून घेतले जात आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून पूर्वी फी जमा झाली आहे, त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ती रक्कम लवकरच पूर्णपणे परत केली जात आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनीही फी माफ झाल्याबद्दल आणि भरलेली फी परत मिळणार असल्याची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

