अंबाजोगाई/बीएन प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शेतातील पाणी उपसण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्यांमध्ये वाद होऊन चौघांनी संगनमत करून एका सेवानिवृत्त पोलिसासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची आणि खिशातील रक्कम काढून घेतल्याची घटना शुक्रवारी (दि. 09) घडली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नागोराव रामराव माळवे (वय ६५ वर्षे, व्यवसाय – शेती, सेवानिवृत्त पोलीस, रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई) यांचे बर्दापूर येथील शेत गट क्र. १९२ मध्ये शेत आहे. दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजेच्या सुमारास नागोराव माळवे आणि त्यांचे शेतशेजारी यांच्यात शेतातील पाणी उपसण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून गंगाधर अंकुश माळवे, अशोक अंकुश माळवे, बकुळा अंकुश माळवे आणि कल्पना अशोक माळवे (सर्व रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई) यांनी संगनमत करून तक्रारदारांवर हल्ला केला. फिर्यादी नागोराव माळवे यांच्या उजव्या हाताला काठी मारून दुखापत केली. तसेच, सोयाबीन काढणीसाठी आणलेले फिर्यादीच्या खिशातील १० हजार ५०० रुपये आरोपींनी काढून घेतले. यासोबतच फिर्यादीच्या मुलास गच्चीला धरून खाली पाडून मुक्कामार दिला व फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली. या मारहाणीदरम्यान त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र गळून पडल्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी नागोराव रामराव माळवे यांच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे हे करत आहेत.

