प्रियकराचा मुलगा आणि मित्रांकडूनच खून
गौतम बचुटे/केज:- जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर पुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मयत महिला शहाबाई बाबुराव चौरे (वय 40, माहेर – शिरूर) हिचे 17 वर्षांपूर्वी तुकुचीवाडी येथील बाबुराव चौरे यांच्यासोबत लग्न झाले होते. मात्र गेल्या 7 वर्षांपासून ती पतीसोबत न राहता जीवाचीवाडी येथील बाळ चौरे यांच्यासोबत पती-पत्नी सारखी राहत होती.दोन आठवड्यांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी तिचा खून करून प्रेत जीवाचीवाडी – चिखलबीड (ता. वडवणी) हद्दीत पुरले होते. दि. 12 ऑक्टोबर रोजी जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून बाहेर काढल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांचे निरीक्षक राहुल सूर्यतळ, सपोनि महेश क्षीरसागर आणि वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत ताब्यात घेत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.
असा लागला तपास
वडवणी पोलिस, केज पोलिस आणि LCB ने समांतर तपास करत सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशीत खरे आरोपी निष्पन्न झाले.आरोपींनी खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत एक दिवस भुस्कटात लपवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी पोत्यात घालून निर्जन ठिकाणी पुरले. घाईगडबडीत खड्डा खोल न खणल्याने प्रेत सडून दुर्गंधी आली आणि प्राण्यांनी उकरल्याने हा खून उघडकीस आला.
अशी फुटली खुनाला वाचा
शाहाबाई चौरे हिचे प्रेत गडबडीत व भीतीने खोल खड्ड्यात न पुरल्याने ते काही दिवसा नंतर सडले आणि त्याच्या दुर्गंधीमुळे जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून ओढत नेल्यामुळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
ताब्यात घेतलेले आरोपी
नवनाथ विलास चौरे, गोविंद बालकिसन चौरे, तुकाराम बाबासाहेब चौरे, विशाल जाधवर या चौघांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

