अंबाजोगाई/प्रतिनिधी:
अंबाजोगाई ते गिता रस्त्यावरील दस्तगीरवाडी शिवारात भरधाव दुचाकी अचानक घसरून झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्याकडे लक्ष न देता निष्काळजीपणे व हयगयीने वाहन चालवून सहप्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी विराज सुजित धुमाळ (वय १९ वर्षे, रा. गिता) यांचे वडील सुजित आबासाहेब धुमाळ हे कुमार सुनील धुमाळ (रा. गिता, ता. अंबाजोगाई) यांच्यासोबत दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. ४४ ए.डी. १५९१) गावी येत होते. अंबाजोगाई ते गिता रस्त्यावरील रेणा नदीच्या पुढे, भताणे यांच्या कोठ्याजवळ दस्तगीरवाडी येथे आरोपीने ताब्यातील दुचाकी रस्त्याकडे न पाहता भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे दुचाकी अचानक स्लिप झाली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे सुजित आबासाहेब धुमाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मयत सुजित धुमाळ यांचे सुपुत्र विराज धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चालक कुमार धुमाळ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बासर करत आहेत.