
केज-मांजरसुंबा रोडवर काळाचा घाला; दोन सख्या भावांचा जागीच अंत, टिप्पर चालकासह दोघे गंभीर
गौतम बचुटे / केज: बीड जिल्ह्यातील -मांजरसुंबा रोडवर जोला-सारुळ पाटीजवळ रविवारी ११ ऑक्टोबर, दुपारी २:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाईच्या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टिप्पर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून पाच गोवंशीय जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अर्धा किलोमीटरपर्यंत आवाज गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नेकनूर येथील आठवडी बाजारातून जनावरे घेऊन पिकअप क्र. एमएच ४४ यू ४३०७ हे अंबाजोगाईकडे येत असताना रेणू पेट्रोल पंपाजवळ समोरून आलेल्या भरधाव टिप्पर क्र. एमएच ४४ यू ९५५७ ने समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेत पिकअपचा चक्काचूर झाला. यात पिकअप मध्ये समोर केबिनमध्ये बसलेले हनीफ शौकत कुरेशी, वय (२० वर्ष) आणि त्याचा भाऊ आरेफ शौकत कुरेशी, वय (२० वर्ष) (रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पिक-अपचा चकनाचूर झालेला असून टिप्पर चालक अमोल खंदारे, (रा. कारेगव्हाण ता. वडवणी) आणि उत्तर प्रदेशातील क्लिनर, पप्पू यादव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दोघा भावांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू
अपघातात मृत्युमुखी पडलेले हनीफ शौकत कुरेशी आणि आरेफ शौकत कुरेशी हे दोन सख्खे तरुण भाऊ मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाता नंतर हनिफ कुरेशी याचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तर आरेफ कुरेशी याचे प्रेत नेकनुर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले दाखल.
नेकनूर अपघात: जखमींना जेसीबीने बाहेर काढले
अपघातात टिप्पर मध्ये अडकलेला चालक अमोल खंदारे आणि क्लिनर पप्पू यादव यांना जेसीबी च्या सहाय्याने केबिनला दरवाजा.उघडून बाहेर काढले. त्या नंतर दोन्ही जखमींना बीड येथील रेणू हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले असून दोघे गंभीर जखमी आहेत.
माहिती मिळताच पोलिस अपघातस्थळी पोहोचले
अपघाताची माहिती केज पोलिस ठाण्यात मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, शेख पाशा आणि गृह रक्षक दलाचे जवान हे तात्काळ अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
पाच जनावरे दगावली
अपघातात पिक अप मधील पाच गो वंशीय प्राण्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्या नंतर प्रचंड आवाज झाला
या अपघाताची माहिती देताना अपघात स्थळा पासून सुमारे अर्धा किमी अंतरावर असलेल्या हॉटेल चालकांनी सांगितले की, अपघात झाल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्या नंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले.
“बीड जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचा”

