डी. सदानंद/अंबाजोगाई: आंबा साखर कारखाना येथे असलेल्या उड्डाणपुलावर (Flyover) सध्या मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून संपूर्ण पुलाच्या रिटेनिंग वॉल (Retaining Wall) मध्ये झाडांचे साम्राज्य पसरले आहे. तर दुसरीकडे अंबाजोगाई ते कारखाना जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या क्रॅश बॅरियर (Crash Barrier) मध्ये काटेरी झाडी आणि गवत अडकल्याने गंभीर अपघाताची (Accident) भीती निर्माण झाली आहे.

या घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुलाच्या मजबुत ब्लॉकच्या भिंतीमधूनच हिरवेगार झाड बाहेर आलेले दिसत आहे. यामुळे पुलाच्या स्ट्रक्चरला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो आणि पावसाळ्यात ब्लॉकमध्ये पाणी मुरून पूल कमकुवत होण्याची भीती आहे. पाण्याची टाकी ते आंबा साखर कारखाना या रस्त्यावरील क्रॅश बॅरियरच्या आजूबाजूला वाढलेल्या झुडपांमुळे बॅरियर पूर्णपणे झाकले गेले आहेत. त्याचा उपयोगच होत नाही. बॅरियरच्या कडेला वाढलेले गवत आणि झाडी यामुळे रस्ता अरुंद झाला असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर दररोज शेकडो अवजड वाहने, ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर, एसटी बसेस आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. हा परळी-लातूरला जोडणारा मध्यवर्ती मार्ग आहे. वळणावर झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळेस हेडलाईटचा प्रकाश झुडपांवर पडून समोरचे काहीच दिसत नाही, त्यामुळे समोरासमोर धडक होऊन अपघाताची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरीही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी टाळाटाळ

हा उड्डाणपूल आणि कारखाना रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून राष्ट्रीय महामार्गाच्या केंद्रीय रस्ते विभागाकडे (Central Road Department) येतो. त्यामुळे देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच आहे. वेळीच झाडी हटवली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंबाजोगाईतील उड्डाणपूल आणि कारखाना रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. झाडी-झुडपांमुळे रोज अपघात होण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ स्वच्छता करावी. जर येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन सेना स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-अजय गोरे (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना)

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...