गौतम बचुटे/केज:- केज पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोरच जोरदार झोंबाझोंबी झाली. यावेळी एका तरुणाने चक्क पोलीस ठाण्यातील खुर्ची उचलून दुसऱ्या गटातील महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी ता. केज येथील महादेव प्रकाश आघाव (वय २६) हा तरुण त्याला झालेल्या मारहाणीसंदर्भात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. पोलीस त्याला वैद्यकीय उपचारासाठी पत्र देत असतानाच, त्याचवेळी जलाल नगर, केज येथील अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या तीन महिला पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलीस ठाण्यातच त्यांनी महादेव आघाव याला पाहताच मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचा राग आल्याने महादेव आघाव याने रागाच्या भरात पोलीस ठाण्यात ठेवलेली लोखंडी खुर्ची उचलली आणि अर्चना प्रकाश आघाव यांच्या दिशेने मारण्यासाठी उगारली. प्रसंगावधान राखत तेथे हजर असलेले हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी धाव घेत ती खुर्ची त्याच्या हातातून हिसकावून घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतरही दोन्ही गटात जोरदार झोंबाझोंबी झाली.यावेळी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, महिला पोलीस कॉन्स्टेबल तरकसे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सांगळे हे कर्तव्यावर हजर होते.
पोलिसांकडून गंभीर दखल
पोलीस ठाण्यातच आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव प्रकाश आघाव, अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राम पवार हे करीत आहेत.


