गौतम बचुटे/केज : केज शहरातील मेन रोड लगत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मेन रोड लगत रस्त्याच्या कडेला अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुष जातीचे प्रेत पडलेले स्थानिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे, बाबाजी दराडे, बजरंग मुंडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून १०८ रुग्णवाहिकेचे पायलट मकरंद घुले आणि डॉ. सूर्यवंशी यांच्या मदतीने सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृतदेह शवागारात ठेवला आहे.
पोलिसांचे आवाहन
सदर मृतदेह सध्या केज उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून, या व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास त्यांनी केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

