अंबाजोगाई: बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे प्रेरणास्थान अभिजीत अरविंदराव जोंधळे यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित ‘वाचन प्रेरणा सन्मान २०२६’ साठी निवड झाली आहे. शासनाच्या भाषा संचालनालयाने नुकतीच ही अधिकृत घोषणा केली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. याच दिवशी मुंबईतील चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत जोंधळे यांना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात येणार आहे.
का मिळाला हा सन्मान?
केवळ नोकरी किंवा व्यवसाय न करता, समाजातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत पुस्तक पोहोचवण्याचे काम जोंधळे यांनी केले. त्यांनी सुरू केलेले तीन उपक्रम राज्यभर गाजले:
१. पुस्तक पेटी योजना: जिथे ग्रंथालय नाही तिथे पेटीतून पुस्तके पोहोचवली.
२. पुस्तक कट्टा: युवकांना एकत्र आणून पुस्तकांवर चर्चा घडवून आणली.
३. वाचक चळवळ: शाळा-महाविद्यालयात जाऊन वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
अभिजीत जोंधळे हे सध्या अनुराग पुस्तकालयाचे संचालक आहेत. यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे LMC सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आणि ‘शब्दोत्सव’ दिवाळी अंकाचे संपादक म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. अंबाजोगाईतील बालकुमार साहित्य संमेलन त्यांच्यामुळेच यशस्वी झाले होते.
यापूर्वीही अनेक पुरस्कार
हा त्यांचा पहिला सन्मान नाही. यापूर्वी त्यांना छत्रपती संभाजीनगरचा ग्रंथसखा पुरस्कार, प्रेम छात्र पुरस्कार, अहमदनगरचा आर्यनंदी सेवा पुरस्कार आणि जळगावचा दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे. आता थेट राज्य शासनाने दखल घेतल्याने अंबाजोगाईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

