विश्वजीत गंडले/घाटनांदूर: विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पवित्र औचित्याचे साधून घाटनांदूर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत ग्रामदैवत श्री सोमेश्वर महाराज यांचा पारंपारिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.
पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि निष्ठेने कायम ठेवण्यात आली असून संपूर्ण घाटनांदूर नगरी भक्तिमय झाली होती.या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील बारा बलुतेदार हेच या पालखीचे मानकरी असतात. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा सोहळा सामाजिक एकोप्याचे प्रतीक मानला जातो.घाटनांदूर येथील श्री सोमेश्वर मंदिर हे अत्यंत आकर्षक आणि प्राचीन असून नुकताच या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जीर्णोद्धारानंतर मंदिराचे रूप अधिकच खुलले आहे.
पूजा पद्धतीचे विशेष महत्त्व
या मंदिरातील पूजा पद्धतीचे विशेष महत्त्व आहे. काशी विश्वनाथ मंदिरातील पूजेप्रमाणेच येथील पूजा केली जाते. विशेष म्हणजे गव्हाच्या राशीवर ही पूजा बसवली जाते, जी भाविकांसाठी एक वेगळी पर्वणी असते. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.विजयादशमीच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर ग्रामदैवत श्री सोमेश्वर महाराज यांच्या मूर्तीला आकर्षक पालखीमध्ये विराजमान करण्यात आले. पालखीला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यानंतर पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून फिरून श्री सोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाली. याच ठिकाणी विजयादशमीच्या मुख्य परंपरेनुसार सीमोल्लंघनाचा विधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
यावेळी गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन मंदिर कमिटीचे अध्यक्ष विजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत मनमोहक आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी कमिटीने घेतली होती. त्यांच्या या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
