Beed News Express | छत्रपती संभाजीनगर: शहरातील मुकुंदवाडी भागातील संघर्षनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दांडिया खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून आणि आईवरून शिवी दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या 8 वर्षाच्या जिवलग मित्राचीच निर्घृण हत्या केली आहे. ही घटना सोमवारी (19 ऑक्टोबर) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मृत तरुणाचे नाव पुष्कर सतीश गाडे (वय 20, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) असे असून आरोपीचे नाव महेश पवार उर्फ भोया (रा. संजयनगर) असे आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि पुष्कर यांच्यात गेल्या आठ वर्षांपासून घट्ट मैत्री होती. पुष्करचे वडील टेम्पो चालक असून तो आई, वडील आणि बहिणीसोबत राहत होता. तो महिनाभरापूर्वीच एका कापड दुकानात कामाला लागला होता, तर महेश मजुरीचे काम करतो.
आईवर शिवी दिल्याने राग
रविवारी रात्री दोघेही संघर्षनगरमध्ये दांडिया खेळण्यासाठी गेले होते. दांडिया खेळत असताना दोघांमध्ये कसल्यातरी कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात पुष्करने महेशला आईवरून शिवी दिली. त्यामुळे महेशचा राग अनावर झाला. भांडण वाढल्यावर पुष्करने आपल्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेला लोखंडी रॉड काढून महेशच्या गुडघ्यावर मारला. त्यानंतर महेशने तोच रॉड हिसकावून पुष्करच्या डोक्यात, चेहऱ्यावर आणि मानेवर जोरदार प्रहार केले. यात पुष्कर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
हत्येनंतर थाप मारून पळ काढला
हा प्रकार घडल्यानंतर पुष्कर मध्यरात्री उलटून गेली तरी घरी परत न आल्याने त्याच्या आईने महेशला फोन केला. तेव्हा महेशने “पुष्कर माझी गाडी घेऊन गेला आहे, तो आला की आम्ही एकत्र घरी येतो” अशी थाप मारली. मात्र हत्येनंतर महेशने आपल्या एका पोलीस मित्राला फोन करून हत्येची माहिती दिली. त्या पोलीस मित्राने तातडीने मुकुंदवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला आहे.या घटनेमुळे संघर्षनगर परिसरात खळबळ उडाली असून 8 वर्षाची मैत्री एका शिवीमुळे संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
