अंबाजोगाई/प्रतिनिधी: बनेश्वर शिक्षण संस्थेच्या गुरुदेव विद्यालय, मोरेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेचा हुशार खेळाडू आदित्य संतोष सुरवसे याने विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवत थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परभणी येथील विभागीय क्रीडा संकुलावर दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि जिल्हा मैदानी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.यामध्ये १७ वर्षे वयोगटात गुरुदेव विद्यालयाचा इयत्ता १० वीचा विद्यार्थी आदित्य सुरवसे याने हॅमर थ्रो या अत्यंत कठीण क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.
त्याच्या या यशाने मोरेवाडीसह संपूर्ण बनेश्वर संस्थेचे नाव उज्ज्वल झाले आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भागवत दादा गोरे आणि सचिव डॉ. नरेंद्र काळे यांनी आदित्यचे मनापासून अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महानंदा शिंदे मॅडम यांनीही त्याचे विशेष कौतुक करून प्रेरणा दिली. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आदित्यला क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आता पुढील राज्यस्तरीय स्पर्धा पालघर येथील विभागीय क्रीडा संकुलात होणार असून त्या स्पर्धेतही यश मिळवण्यासाठी आदित्य कठोर परिश्रम घेत आहे.
