अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात मंगळवारी एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. एका बाजूला शिक्षणासाठी शहरात आलेला होतकरू तरुण तर दुसऱ्या बाजूला न्यायालयीन क्षेत्रातील अनुभवी वकील अशा दोघांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

१) विवेकानंद नगरमधील घटना :

पहिली घटना शहरातील विवेकानंद नगर, नागझरी परिसरात घडली. मूळचा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील रहिवासी असलेला आदित्य आंगद गुंजकर (वय २२) हा शिक्षणानिमित्त अंबाजोगाई येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. ही बाब लक्षात येताच शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला.आदित्य हा हुशार आणि शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अशा जाण्याने मित्रपरिवार आणि गावात शोक व्यक्त होत आहे.

२) वकील संघातील घटना :

दुसरी घटना अंबाजोगाई न्यायालयीन वर्तुळातील आहे. येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एल. एम. दामा यांनी देखील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ॲड. दामा हे अंबाजोगाई वकील संघातील एक अनुभवी आणि परिचित चेहरा होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने वकील संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पोलीस तपास सुरू :या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण काय? कौटुंबिक अडचण, आर्थिक विवंचना, मानसिक तणाव की अन्य काही कारण आहे का? याचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.पोलिसांनी दोन्ही ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. स्वाराती रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवल्यानंतरच या घटनांचा अधिक खुलासा होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...