अंबाजोगाई(प्रतिनिधी):
अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथील ऐतिहासिक लांडगदरा तलाव हे गावचे वैभवच नव्हे, तर गावाच्या समृद्धीचे प्रतीक होते. या तलावामुळे गेल्या शंभर वर्षात कधीही गावात पाणीटंचाई जाणवली नाही.
तलावात बारमाही पाणी असल्याने खालील भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा उपयोग होत होता. रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना या तलावाच्या पाण्यावर शेती करता येत होती. मात्र शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच हा तलाव पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या तलावाच्या दुरवस्थेमागे एक-दोन नव्हे, तर अनेक कारणे कारणीभूत आहेत. यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. पाऊस कमी पडणे हे मुख्य कारण असले तरी प्रशासनाचे दुर्लक्ष हे त्याहून मोठे कारण ठरले आहे. या तलावातून गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या मोटारींनी बेसुमार पाणी उपसा सुरू होता. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही. त्याचबरोबर तलावाच्या भरावावर (बांधावर) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मोठी झाडे आणि झुडपे वाढली आहेत. या झाडांच्या मुळांमुळे बांध कमकुवत झाला असून पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने कधीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. वेळोवेळी गाळ काढणे, बांधाची दुरुस्ती करणे आणि झाडे काढणे यासारखी कामे झालीच नाहीत.परिणामी, जो तलाव शंभर वर्षे गावाला जगवत होता, तोच आज कोरडा पडला आहे.
तळाला मोठ्या भेगा
तलावाच्या तळाला मोठ्या भेगा पडल्या असून पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही. मुक्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे पाण्याविना हाल होत आहेत. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून तलावाच्या भरावावरील झाडे काढावीत, गाळ काढून तलाव खोलीकरण करावे आणि गावासाठी तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे.
शंभर वर्षांपूर्वी लांडगदरा तलाव हा तयार करण्यात आला होता. शंभर वर्षांपासून कधीही हा तलाव कोरडाठाक पडला नाही,परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शंभर वर्षानंतर हा तलाव कोरठाक पडला आहे. – सिताराम तरकसे गुरुजी (शेतकरी धावडी)
