अंबाजोगाई: “शाळा म्हणजे फक्त चार भिंती नसतात, ती संस्काराची शाळा असते.” हे वाक्य अनेकदा आपण भाषणात ऐकतो. मात्र अंबाजोगाईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडके यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.51 हजारांचा स्वखर्च, रोटरीची साथअंबाजोगाई शहरातील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, गुरुवार पेठ या शाळेची दुरावस्था झाली होती. स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले, आतील भांडे खराब, वॉश बेसिन फुटलेले आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती.ही परिस्थिती पाहून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडके यांनी स्वतः ५१ हजार रुपये खर्च केले. तसेच रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून ५८ हजार रुपये निधी मिळवून शाळेचा कायापालट केला.या निधीतून स्वच्छतागृहाची दुरुस्ती, नवीन वॉश बेसिन बसवणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे आणि शाळेची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली.
भिंती झाल्या बोलक्या
फक्त दुरुस्तीच नाही, तर शाळेच्या भिंतीवर विविध प्रकारची शैक्षणिक आणि बोधपर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे शाळेच्या भिंती आता बोलक्या झाल्या असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण
या उपक्रमाचे लोकार्पण रोटरीचे माजी प्रांतपाल सुधीर लातुरे, प्रांत पदाधिकारी रविंद्र बनकर, अमित वैद्य, रोटरी अध्यक्ष शेख शकील, सचिव राधेश्याम लोहिया, माजी अध्यक्षा रोहिणी पाठक, उपप्रांतपाल मोईन शेख, धनराज सोळंकी, संतोष मोहिते, प्रा. अजय पाठक, रुपेश रामावत, प्रवीण चोकडा यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोटरी क्लब आणि राजेंद्र घोडके यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
