अंबाजोगाई/प्रतिनिधी:- अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा गावात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील सारिका अरुण मोरे यांनी आपल्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी फायनान्सचे कर्ज काढून घरात रोख रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सुमारे ३२ हजार रुपये रोख आणि ७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.तसेच गावातील आणखी एका कुटुंबातील सुंदर भागूराम गवळी यांचे कुटुंब दिवसा कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरातील ११ हजार ५०० रुपये रोख आणि कानातील ७ ग्रॅम वजनाचे झुबंर असा ऐवज लांबवला.याच रात्री चोरट्यांनी गावातील तिसरे घर असलेले पांडुरंग तोडकर यांचेही घर फोडले, मात्र घरात रोख रक्कम किंवा दागिने न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य आकाश देशमुख यांनी धोंडणे पोलीस चौकीला दिली. माहिती मिळताच बीड येथून ठसे तज्ज्ञांचे पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळी ५ वाजता पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.दरम्यान, या प्रकरणी रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती धोंडणे चौकीचे बिट अंमलदार राजेंद्र ननवरे यांनी दिली. एकाच रात्रीत तीन घरे फुटल्याने ममदापूर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...