गौतम बचुटे / केज: बीड जिल्ह्यात ऑक्टोबर हिट वाढताच दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. खरीप हंगामात मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग आणि कपाशीची पेरणी केली होती, मात्र दोन ते सव्वा दोन महिन्यांच्या प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे ही पिके वाया गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगा दाणे भरण्यापूर्वीच वांझ ठरल्या आहेत.

याचाच मोठा फटका केज तालुक्यातील माळेगाव येथील शेतकरी महादेव घाडगे यांना बसला आहे. घाडगे यांनी कर्ज काढून आपल्या दोन एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. पूर्वमशागत, नांगरणी, शेणखत, बेसल डोस, मल्चिंग, बांबू आणि तारेच्या सहाय्याने बांधणी असा सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला. पीक जोमात असताना आणि फुला-फळांनी बहरत असतानाच पावसाने खंड दिला. सुरुवातीला विहीर आणि बोअरच्या पाण्यावर पीक जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र सलग ६० ते ७० दिवस पाऊस न पडल्याने पाणी पातळी खोल गेली आणि ऐन उत्पन्नाच्या तोंडावर आलेलं संपूर्ण टोमॅटो पीक डोळ्यादेखत करपून गेलं. यामुळे उत्पन्नातून नफा मिळणे दूरच, पण केलेला खर्च आणि घेतलेली मेहनतही वाया गेली आहे. शेतकऱ्याच्या हाती शून्य लागले आहे.

“तोकडी मदत नको, तर भरीव मदत हवी. सरकारने जाहीर केलेली मदत ही झालेल्या खर्चासमोर अत्यंत कमी आहे. किमान खर्च निघेल एवढी तरी मदत द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...