बीड/प्रतिनिधी: नवीन खरेदी केलेली सीएनजी अप्पे रिक्षा सोडण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली असून दोघांना आज ताब्यात घेतले आहे.
तक्रारदाराने नवीन खरेदी केलेली सीएनजी अप्पे रिक्षा पासिंग न करता चालवल्याने गेवराई पोलिसांनी ती जप्त करून ठाण्यात लावली होती. ती रिक्षा सोडवण्यासाठी गेवराई ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन संतराम शिंदे (वय ४८, बं.नं. १०४५, रा. शाहू नगर, बीड) आणि पोलीस हवालदार रामराव केशव आघाव (वय ४६, बं.नं. ३२७, रा. शिक्षक कॉलनी, बीड) यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस हवालदार रामराव आघाव यांनी पंच व एएसआय नितीन शिंदे यांच्यासमक्ष, शिंदे यांच्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली व ती रक्कम शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले. यावेळी एएसआय शिंदे यांनी पंचांसमोर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते.
दरम्यान आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची भेट टाळल्याने प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपींना आज दुपारी ताब्यात घेण्यात आले – नितीन शिंदे यांना दु. १.१५ वा. तर रामराव आघाव यांना दु. ३.२० वा.ही कारवाई पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्र माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि. बीडचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोह मच्छिंद्र बिडकर, पोह अनिल शेळके, पोशि राजकुमार आघाव, पोशि अमोल खरसाडे, पोशि प्रदीप सुरवसे, चापोशि अंबादास पुरी यांच्या पथकाने केली.
