गौतम बचुटे/केज:- केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरीला गेलेले ११ महागडे मोबाईल फोन पोलिसांनी सखोल तपास करून हस्तगत केले असून, ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवणे आणि चोरीला जाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या अधिनस्त असलेल्या स्थानिक गुन्हे शोध (डीबी) पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल तरकसे, शिवाजी कागदे, नितीन वारे आणि संतोष गिते यांच्या पथकाने CEIR या अत्याधुनिक प्रणालीच्या माध्यमातून या मोबाईलचा शोध घेतला.
सखोल तांत्रिक तपास करून हे सर्व ११ मोबाईल हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी या सर्व मोबाईल मालकांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्यांचे मोबाईल त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केज पोलीस आणि डीबी पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
