विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी येथे पाणी चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) घडली आहे. या घटनेने पट्टीवडगाव महसूल मंडळात खळबळ उडाली असून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजपाल खंडू बैकरे (वय ५० वर्षे) हे ग्राममहसूल अधिकारी म्हणून सजा पट्टीवडगाव येथे मागील साडेपाच वर्षांपासून कार्यरत आहेत. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पाझर तलावांवरील अनधिकृत मोटारी जप्त करून कारवाई करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने दिले होते. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी बैकरे हे ग्रामपंचायत अधिकारी मुंजाजी फड, ग्रामरोजगार सहायक गोविंद कांदे व ग्रामपंचायत सेवक बाबुराव कांदे यांच्यासह वाकडी शिवारातील पाझर तलावावर मोटारींची पाहणी करण्यासाठी गेले होते.

मोटर-स्टार्टर काढण्यावरून वाद

तलावावर अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारीचे स्टार्टर ते काढत असताना वाकडी येथील ज्ञानेश्वर मुकुंदराव कांदे हा तेथे आला. तू कोण आहेस मोटर काढणारा, तुला काय अधिकार आहे, असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने ग्रामपंचायत आवारात पडलेली वीट उचलून बैकर यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच पायाच्या मांडीवर व पाठीवरही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी उपस्थित तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयात उपचार

जखमी अवस्थेत बैकरे यांनी बर्दापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर मुकुंदराव कांदे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.