गौतम बचुटे/केज :- वाढदिवसाचा केक कापण्यासाठी सुरीऐवजी तलवारीचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांवर केज पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची रील सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक तलवार आणि दोन खंजीर जप्त करण्यात आले आहेत.
केज शहरात दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. अजय अशोक तांदळे याने आपल्या वाढदिवसानिमित्त केक कापताना तलवारीचा वापर केला. या घटनेचा व्हिडिओ त्याच्या साथीदारांनी सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोशल मीडियावरील व्हिडिओने वेधले पोलिसांचे लक्ष
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले डी.बी. पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून असताना हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांना तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडिओ आढळला. त्यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूर्यतळ यांनी डी.बी. पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
अशी झाली कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 9 ऑक्टोबर रोजी विशेष पथकाने कारवाई केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, महिला हेडकॉन्स्टेबल कविता गायकवाड, कॉन्स्टेबल संतोष गिते, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे आणि दादाराव देवगुडे यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अजय तांदळे आणि त्याचा मित्र सदाशिव नामदेव आंधळे (रा. नामेवाडी) या दोघांना ताब्यात घेतले.
घरातून तलवार आणि खंजीर जप्त
पोलिसांनी चौकशी केली असता सदाशिव आंधळे याच्या राहत्या घरात भिंतीवर खुंटीला 3 फूट लांबीची म्यानसह तलवार लटकवून ठेवलेली आढळली. पंचनामा करून घराची झडती घेतली असता 6 इंच आणि 8 इंच लांबीचे दोन खंजीर देखील मिळून आले. पोलिसांनी तिन्ही शस्त्रे जप्त केली आहेत.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 641/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 25, 4 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 12 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे करीत आहेत.
पोलीस निरीक्षकांचा इशारा

“कोणीही शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील, व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करून कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही,” असा कडक इशारा पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिला आहे.

