गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील गौरवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराजवळ खेळत असलेल्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

मयत मुलीचे नाव सुप्रिया बाबरू घाडगे (वय १३, रा. गौरवाडी) असे आहे. ती गौरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घराजवळच्या अंगणात मैत्रिणींसोबत खेळत होती. त्याचवेळी अचानक झाडाझुडपातून आलेल्या विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला. सुरुवातीला तिला किरकोळ वाटले, परंतु काही मिनिटांतच तिला चक्कर येणे, उलट्या होणे असा त्रास सुरू झाला.

वेळेवर उपचार मिळाले नाहीत

कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र गौरवाडी हे दुर्गम गाव असल्याने आणि सायंकाळच्या वेळी वाहनांची सोय नसल्याने तिला वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही. जवळपास एक तासानंतर मिळालेल्या वाहनाने तिला नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. जर वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते, अशी हळहळ गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वडीलांचे दोन वर्षापुर्वी निधन

घटनेने घाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुप्रियाचे वडील बाबरू घाडगे यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. तेव्हापासून तिची आई ऊसतोडणी करून पाच मुली आणि एका मुलाचा सांभाळ करत आहे. आई सध्या साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी जाण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने खाजगी वाहन करून तिला लवकर नेता आले नाही.या घटनेमुळे गौरवाडी परिसरात सर्पदंशावरील लस आणि ग्रामीण भागात १०८ रुग्णवाहिकेची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...