
गौतम बचुटे, केज: केज तालुक्यात सोयाबीन जाळण्याच्या घटना थांबता थांबत नसून रिपब्लिकन पक्षाचे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनाच टार्गेट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
केज तालुक्यातील लव्हूरी येथील दीपक कांबळे आणि त्यांच्या भावाच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० वाजता आग लावली. शेजारील शेतकऱ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहून त्यांना फोनवर माहिती दिली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व सोयाबीन जळून खाक झाले होते.यामुळे कांबळे बंधूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी त्यांनी तहसीलदार अशोक भंडारे आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्याकडे तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहा दिवसात सातवी घटना
या आधी टाकळी येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वा. बाबासाहेब घुले, ११ ऑक्टोबर रोजी सायं. ५:३० वा. गिरजाबाई घुले, आणि १२ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी चार शेतकऱ्यांच्या गंजी जळाल्या होत्या. आता १४ ऑक्टोबरला दीपक कांबळे यांची ७ वी घटना आहे.सततच्या आगीमुळे केज तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले असून पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्चाच्या तयारीमुळे मळणीस विलंब
केज तालुका रिपाइंचे अध्यक्ष दिपक कांबळे हे दि. १६ मार्च रोजी बीड येथे पप्पू कागदे यांनी आयोजित केलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपाइंचे नेते ना. रामदास आठवले यांच्या समता क्रांती मार्चच्या पूर्वतयारी निमित्त गावोगावी बैठका आणि कोपरा सभा घेत असताना त्यांना कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनची मळणी करण्यास विलंब झाला होता.

