गौतम बचुटे/केज :- केजच्या गट शिक्षण कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीचा जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे. चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि एका शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आल्याने केजच्या शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका शिक्षकाविरोधातील तक्रारीची चौकशी गट साधन केंद्रात सुरू होती. हा चौकशी अहवाल तक्रारदार शिक्षकाच्या बाजूने तयार करून तो वरिष्ठांकडे न पाठवण्यासाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती.लाच देण्याची इच्छा नसल्याने पीडित शिक्षकाने थेट जालना एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास केजच्या गट साधन केंद्रात सापळा रचला.ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताच पथकाने छापा टाकला. या कारवाईत विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांच्यासह शिक्षक जयगुरु गिरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. जालना एसीबीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...