ङि सदानंद/अंबाजोगाई: अंबाजोगाई–लातूर या अत्यंत महत्त्वाच्या आणि सातत्याने वर्दळ असलेल्या महामार्गाची दैना झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दररोज हजारो वाहनांकडून या मार्गावर खणखणीत टोल वसूल केला जात आहे, मात्र रस्ता दुरुस्तीच्या नावाने शून्य कारभार सुरू असल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘टोल घेता, मग सुविधा कुठे आहेत?’ असा रोखठोक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
अंबाजोगाईजवळील साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या अगदी मधोमध एक महाकाय खड्डा पडला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी स्पीडब्रेकर असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावा लागत आहे किंवा खड्डा चुकवताना गाडीवरील ताबा सुटून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या धोकादायक खड्ड्यापासून अवघ्या काही अंतरावर पुढील स्पीडब्रेकरजवळ रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. एवढेच नव्हे तर, जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातील मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे बांधकाम विभागाच्या निकृष्ट आणि बोगस कारभाराची पोलखोल झाली आहे. या मुख्य मार्गावरून दिवस-रात्र अवजड वाहने, एसटी बसेस, चारचाकी आणि दुचाकींची मोठी वाहतूक सुरू असते. रस्त्यावरील या खोल खड्ड्यांमुळे वाहनांचे सस्पेन्शन, टायर व मोबिलायझरचे मोठे नुकसान होत असून वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हे खड्डे अदृश्य सापळा बनत असून भीषण अपघाताची टांगती तलवार चालकांच्या मानगुटीवर बसली आहे. एकीकडे महामार्गावर टोलनाका उभारून वाहनधारकांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे, तर दुसरीकडे रस्त्याची ही दुरवस्था पाहून हा रस्ता म्हणजे ‘वाली नसलेले पोरके बाळ’ झाले आहे का, अशी जळजळीत टीका नागरिक करत आहेत. एखादा निष्पाप बळी गेल्यानंतरच प्रशासनाला आणि संबंधित कंत्राटदाराला जाग येणार का? असा सवाल आता वाहनधारकांकडून विचारला जात आहे.
जबाबदारी कोणाची?
अनेकांचा असा समज असतो की या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) आहे, मात्र या महामार्गाची देखभाल, दुरुस्ती आणि संरक्षणाची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे’ (National Highways Authority of India – NHAI) आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित टोल कंत्राटदार या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत. टोलचा पैसा गोळा करण्यात दाखवली जाणारी तत्परता रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात का दाखवली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारत आहेत.
टोलवसुली जोरात, दुरुस्ती कधी? तीव्र आंदोलनाचा इशारा!
नियमित कर आणि टोल भरूनही जर वाहनचालकांना खड्ड्यातूनच धोकादायक प्रवास करावा लागत असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गाची पाहणी करून स्पीडब्रेकरजवळील खचलेला रस्ता आणि खड्डे तात्काळ न बुजवल्यास, अंबाजोगाई-लातूर मार्गावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी दिला आहे.

